- दोन वर्षे राजकीयदृष्ट्या बाजूला झालेले माजी नगरसेवक व पदाधिकारी ‘अॅक्टिव्ह’ मोडवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२४) :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी कामाला लागले आहेत. मतदारांशी संवाद साधत आहेत. प्रचार करण्याची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महापालिकेतील मुदत संपल्याने काहीसे बाजूला झालेले माजी नगरसेवकही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात दंग झाले आहेत. त्यांनी गुप्त बैठकांना सुरुवात केली आहे.
महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपली. त्यामुळे पालिकेत प्रशासकराज येऊन नगरसेवकांची वर्दळ कमी झाली. नागरिकांना कामासाठी नगसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयात न जाता महापालिकेत फेऱ्या मारण्याची वेळ आली. माजी नगरसेवक व महापालिकेसाठी इच्छुक असलेले निवडणुकीची वाट पाहत होते. मात्र, पालिकेऐवजी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर दोन वर्षे राजकीयदृष्ट्या बाजूला झालेले माजी नगरसेवक व पदाधिकारी ‘अॅक्टिव्ह’ झाले आहेत.
निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची, शहरी भागात महापालिकेतील संख्याबळावर समीकरणे ठरतात. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या माजी नगरसेवकांवर ‘डोअर टू डोअर’ प्रचार करण्याची धुरा सोपवली आहे. आपल्या प्रभागांतील एकगठ्ठा मतदान पक्षाच्या उमेदवाराला कसे पडेल? यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रभागातील दादा, भाऊ, ताईवरच जास्त विश्वास…
गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज आहे. सर्वच कारभार अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक प्रभागातील समस्या मांडण्यासाठी माजी नगरसेवकांच्या दारीच जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी येत असले तरी लोकांचा अधिकाऱ्यांपेक्षा प्रभागातील माजी नगरसेवक असलेल्या दादा, भाऊ आणि ताईवरच जास्त विश्वास आहे. सुमारे अडीच वर्षापासून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांत दुरावा पडतो की काय, अशी परिस्थिती असताना लोकसभा निवडणुकीचा मोका साधून माजी नगरसेवक व पदाधिकारी पुन्हा मैदानात उतरले आहेत.
पदाधिकारी झाले सक्रिय…
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांना नेते व उमेदवारांकडून बोलावणे येत आहे. त्यासाठी आपल्या प्रभागातील नागरिकांशी त्यांनी भेटी गाठी सुरू केल्या आहेत. त्यासाठी विवाह सोहळे, पूजा, धार्मिक विधी यामध्ये हजेरी लावली जात आहे.