न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी सहा वाजता सांगता झाली आहे. त्यामुळे नियमानुसार मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबू देऊ नये, अशी मागणी शिवसेना- भाजप महायुतीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांची भेट घेऊन त्यांना व निरीक्षक अधिका-यांना देखील याबाबतचे निवेदन दिले आहे.
यावेळी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, ”मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी ( दि. २९) रोजी मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. प्रचार थांबल्यानंतर मतदारसंघाबाहेरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारसंघात थांबता येत नाही. पुणे जिल्ह्यातील पुणे व बारामती मतदारसंघातील तसेच राज्यातील तीन टप्प्यातील बहुतांश मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने, बाहेरच्या मतदारसंघातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी / कार्यकर्ते व अज्ञात व्यक्तींचा वावर मावळ लोकसभा मतदारसंघात वाढलेला आहे. आमचा कार्यकर्ता प्रचारापासून दुरावला जात असून, दहशतीचे, भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारसंघाबाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे वातावरण मुक्त व निष्पक्ष राहण्यात अडचण येऊ शकते. यामुळे निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासनाने दक्ष राहुन प्रचारासाठी आलेली बाहेरील व्यक्ती मतदारसंघात राहणार नाही, त्याची खात्री करुन, खबरदारी घेण्यात यावी.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५९ चे कलम १२६ अन्वये मतदानाआधी ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करण्याची तरतूद आहे. या कलमांतर्गत जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचारक, मतदार संघाच्या बाहेरील पक्षाचे कार्यकर्ते / व्यक्ती संबंधित मतदारसंघात राहू शकत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. मतदारसंघाबाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वातावरण मुक्त व निष्पक्ष राहण्यात अडचण येऊ शकते. मतदारसंघाबाहेरील व्यक्ती राहू शकणारी संभाव्य ठिकाणे यात सार्वजनिक सभागृहे, खासगी हॉल, रेस्ट हाउस, लॉंजिंग, हॉटेल्स, मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात यावी आणि त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.











