न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा संकल्पनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू आहे. म्हणून महायुतीच्या खोट्या जाहीरातबाजीला, भाषणाच्या थापांना, फोटो, व्हीडीओच्या बनवाबनवीला न भुलता महायुतीच्या उमेदवाराला सोडून २० पैकी कुठल्याही सक्षम उमेदवाराला आपले पवित्र मतदान नागरिकांनी करावे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, ”सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी यांनी ४१४ जनसभा घेतल्या. या सभांमधून विदेशातील काळा पैसा देशात आणून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या बॅक खात्यात १५ ते २० लाख जमा होतील, शेतमालाला उत्पादित खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमी भाव देऊ. बेरोजगार तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करू, पेट्रोल, डिझेल गॅसदरवाढ नियंत्रित ठेवून महागाई वाढू देणार नाही. भय व भ्रष्टाचार मुक्त करू अशा घोषणा करताना सबका साथ सबका विकास म्हणत. अच्छे दिनाचा नारा बुलंद केला.
मोदी सरकारची पाच वर्षे पुर्ण होताना भारतीय नागरिकांच्या खात्यावर १५ ते २० लाख देण्याचे आश्वासन हा एक चुनावी जुमला होता. हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा खुले बोलले आहेत. शेतमालाला उत्पादित खर्च अधिक ५० टक्के नफा देता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र देशाच्या मा. सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने दिले आहे. प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार म्हणजे पाच वर्षात १० कोटी रोजगार निर्मीती व्हायला हवी होती. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तुघलकी नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था उध्वस्त होऊन आहे. त्यातील ४ कोटी रोजगार कमी झाले. सन २०१४ ला प्रति लिटर ६० ते ७० रु. पेट्रोलचा दर असताना तो मोदी सरकारच्या काळात ८० ते ८५ रुपयांपर्यत गेला. गॅसचा दर ३५० ते ४०० असणारा दर ८०० ते ८५० रुपयांवर गेला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ़ष्टाचाराची गटारगंटा दूथडीभरून वाहून पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे कार्यालय, प्रकल्प पालघर येथे होणारे कोस्टगार्ड हब, पोरबंदर गुजरात येथे हलविले. मुंबईतील रिझर्व बँकेचे कार्यालय गुजरातला हलविले. उरण येथील ३५०० एकर जमीन अदानी ग्रूपला दिली. न्हाव – शिवा येथे असलेले व्यवसाय ८० टक्के पोरबंदर गुजरात येथे नेला. मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला हलविले. कपडा मार्केट मुंबईतून हद्दपार करून गुजरातमध्ये हलविले. सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, निवडणुक आयोग या स्वायत्त संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी हस््तक्षेप केला. जातीचे, धर्माचे राजकारण करून प्रचंड दरी निर्माण केला गेला . भारतीय लोकशाहीवर, सी बी आयवर,रिझर्व्ह बँकेवर संविधानावरचा हल्ला झाला.. प्रधानमंत्र्यानी सन २०१४ला दिलेली आश्वासने व वक्तव्य या सर्व एक एक करीत या“बाता” मोठ्या “थापा” होत्या हेच सिद्ध झाले आहे.
लोकसभा निवडणुक सन २०१४ मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भाजपाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपल्या वचननाम्यात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवू. शास्तीकर माफी देऊ. रेडझोनचा प्रश्न सोडवू. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून देऊ. एच. ए. कारखान्याचे पूनवर्सन करू, एसईझेड, एमआयडीसी, पुररेषा व प्राधिकरणाचे प्रश्न सोडवू, मतदार संघातील रेल्वेफेऱ्या वाढवू, लोणावळा ते पुणे व हिंजवडी परिसरात मेट्रो लोणावळा, खंडाळा, माथेरान परिसरात पर्यटन विकास त्यातून रोजगार, पनवेल येथील विमानतळ परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, जेएनपीटी (उरण) प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के परतावा मिळवून देऊ. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करू, मावळ मतदार संघात रोजगार निर्मीती करू. अशी जाहीर वचने दिली. आप्पानी सन २०१४ ला हे करु ते करु म्हणाले मात्र यातील बहुतांशी बाता करून त्याही गप्पाच निघाल्या.
काल दि. २५ रोजी पालकमंत्री गिरीष बापट यांनी महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे सन २०१४ वचननाम्याचे नामकरण करून संकल्पनामा म्हणून बापट यांनी प्रसिद्ध केला. त्यात नवी मुंबई विमानतळ, रेल्वे सुविधा वाढवणार, औद्योगिक धोरण, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, रस्ते, दळणवळण सुधारणा व जलवाहतुक, अनधिकृत बांधकाम निममित करणे, रेडझोन आणि कामगार प्रश्न, नदी सुधार प्रकल्प, पर्यटन विकास, बंदर विकास, झोपडपट्टी पूनर्वसन याचा उल्लेख करण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सन २०१४ वचननामा व सन २०१९ संकल्पनामा नीट वाचला तर सन २०१४ च्या वचननाम्यातील बहुतांशी आश्वासने पुन्हा सन २०१९ च्या संकल्पनाम्यात पुन्हा महायुतीने दिली आहेत. याचा सरळ अर्थ आहे. श्री. बारणे यांनी दिलेली बहुतांशी आश्वासने सोडवण्यास अपयश आले आहे. याचा त्यांनीच पुरावा दिला आहे. अनियमित बांधकामांचा प्रश्न सुटला नाही, शास्ती माफ झाला नाही, रेडझोनची हद्द कमी झाली नाही, प्राधिकरणात शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला नाही, एचए कामगार देशोधडीला लागला. नवी मुंबई विमानतळासाठीचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. उरण जे एनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्यांच्या परताव्याचे बोगस इरादापत्र वाटून त्यांच्या तोंडाला पाने पुसले, वन जमिनीवरील घरे नियमीत झाले नाही. घाटाखाली रस्ते पाण्याचे प्रश्न आहे तशीच आहेत, नवीन कारखाने निर्माण झाले नाही, नवीन आयटी पार्क आले नाही. कुठेही पर्यटन विकास होऊन रोजगार निर्माण झाला नाही, शिक्षणाच्या बाबतीत समस्या आहेत तशीच आहे. नदी सुधार झाली नाही, बंदर विकास झाला नाही, त्यामुळे आप्पाचा सन २०१९ चा संकल्पनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असाच म्हटला पाहिजे.
भाजपाचे आमदार शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांनी युती व्हायच्या अगोदर श्रीरंग बारणे हे निष्क्रीय आहेत. श्रीरंग बारणे हे फोटोवाले खासदार आहेत. मावळ लोकसभेतील त्यांची विकासकामे दुर्बिनीतून शोधावे लागतील. मावळचा हा मावळता खासदार आहे, अशी जाहीर टीका जगताप करीत होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी मी अनुभवलेली संसद, आपला वैभवशाली मावळ, मावळची विकासगाथा, या पुस्तकात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, विरोधी पक्षाचे नेते यांच्याबरोबर स्वतःहाचे असणारे ५०० पेक्षा जास्त फोटो छापून प्रचार केला आहे. त्याचबरोबर संसदेत १११० प्रश्न विचारले. २८९ प्रश्नावर चर्चेत सहभाग, २० खासगी विधेयक, ९१ टक्के उपस्थिती तसेच मी सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार विजेता आहे. याचाही प्रचार त्यांनी केला. खरेतर संसदरत्न पुरस्कार हा खासगी संस्थेने दिला आहे. पैसे घेऊन पुरस्कार वाटप करणाऱ्या ५६ खाजगी संस्था आहेत. तुम्ही संसदेत किती प्रश्न विचारले. किती चर्चेत भाग घेतला, यापेक्षा तुम्ही सन २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी किती प्रश्न सोडविले. मतदार संघातील मतदारांना, तरुण, युवक – युवतींना प्रत्यक्ष लाभ काय झाला? त्याचे उत्तर दोन चार अपवाद वगळता शुन्य आहे. हेच खेर आहे…. त्यामुळे मावळ मतदारसंघातील मतदारांनी या भुलभुल्लायांना न भुलता, थापांना बळी न पडता शिवसेना – भाजपा महायुतीला मते न देता. आपल्या सद्सविवेक बुद्धीजागृत ठेवून शिवसेना-भाजपा महायुती सोडून इतर २० उमेदवारांपैकी सक्षम उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन भापकर यांनी या पत्राद्वारे केले आहे.











