- मतदारांच्या मोबाईलवरच आता थेट मतदार चिठ्ठी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांकडून आधुनिक प्रणालीचा वापर केला जात आहे. मतदारसंघातील मतदारांच्या मोबाईलवरच आता थेट मतदार चिठ्ठी (व्होटर स्लीप) पाठविली जात आहे. या चिठ्ठीत मतदाराचे नाव, बुथ क्रमांक, बुथचे नाव, खोली क्रमांक अशी माहिती आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती घरबसल्या मिळत आहे. याशिवाय ही सर्व माहिती मोबाइलवर आल्याने मतदान चिठ्ठी जपून ठेवण्याची अथवा सोबत नेण्याची गरज भासणार नाही.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १३ तारखेला मतदान आहे. या दिवशी कंपन्या व खासगी आस्थापनांनी पगारी सुटी द्यावी, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, काही कंपन्यांमध्ये पगारी सुटी दिली जाणार आहे. तर, काही ठिकाणी कर्मचार्यांना मतदानासाठी २ तासांची सवलत दिली जाणार आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पिंपरी आणि चिंचवड विधानसभा निवडणूक कार्यालयाकडून सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हे प्रयत्न होत असले तरीही अनेक मतदारांचा मतदान केंद्रात पोहोचल्यावर गोंधळ उडतो. त्यांना तेथे गेल्यावर त्यांचे केंद्र दुसरीकडे असणे, नाव सापडले तर ते दुसर्या केंद्रात असणे अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मतदारांची चिडचिड होऊन मतदान न करण्याची त्यांची मानसिकता होत असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचार्यांच्या माध्यमातून मतदान चिड्डी घरपोच केली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांकडून मतदारांचे मोबाईल क्रमांक संकलित करून थेट मोबाईलवरच मतदान चिठ्ठी पाठविण्यात येत आहे.