- तळवडे-निगडी मार्गावरील ‘चक्काजाम’मुळे रोज पडतोय लेटमार्क..
- ‘खिसा होतोय रिकामा; वाहनचालकांची आर्जव ऐका’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- तळवडे-निगडी मार्गावरील गणेशनगर चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. येथील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊन दूरपर्यंत रांगा लागतात. सततच्या या कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. येथील रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
निगडी-तळवडे या मार्गावरून शहरात येण्यासह तळवडेतील आयटी पार्क, चाकण एमआयडीसी तसेच देहू-आळंदीला जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर गावठाण, मंदिर यासह अनेक कंपन्या असल्याने या मार्गावर सतत वर्दळ असते. वाहनांची संख्याही अधिक असते. वाहतुकीसाठी निगडी ते तळवडे चार पदरी रस्ता आहे. मात्र, नेमका गणेशनगर येथील वळणावर हा रस्ता दोनच पदरी होतो. अचानक दोन लेन कमी झाल्याने या पॉइंटवर वाहनांची कोंडी होते. याच भागात लगतच्या दोन्ही बाजूने दोन छोटे रस्ते येतात. ही वाहनेही याच पॉइंटवर रस्त्यावर येतात. यामुळे कोंडीत आणखीनच भर पडते.
सायंकाळी आयटी पार्क सुटल्यानंतर तर तळवडेकडून निगडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात. अनेक वाहने या कोंडीत अडकून पडतात. वाहतूक नियमनासाठी पोलिसांची नेमणूक केली जाते. मात्र, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांचीही अक्षरशः दमछाक होते. तरी येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील रस्त्याचे रुंदीकरण करून आणखी योग्य त्या उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोंडीमुळे लेटमार्क..
देहूगाव, तळवडे या भागातून शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त निगडीच्या दिशेने येणारे, तसेच निगडी, पिंपरी-चिंचवड परिसरातून तळवडेच्या दिशेने आयटी पार्कसह एमआयडीसीतील कंपन्यांत कामाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, गणेशनगर चौकातील वाहतूक कोंडीमुळे कामावर पोचण्यास उशीर होत असून, नोकरदारांचा कामाच्या ठिकाणी लेटमार्क पडत आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही उशीर होतो.
निगडी ते तळवडे चार पदरी असलेला रस्ता या परिसरात दोन पदरी होतो. येथे रस्ता खूपच अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडी होते. दरम्यान, या चौकात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नेहमीच वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असते. येथील रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
– संदीप जमदाडे, सहायक पोलिस निरीक्षक, तळवडे वाहतूक विभाग.











