- अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२४) :- मावळ मतदारसंघाच्या ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्राँगरूम’च्या सीसीटीव्हीचा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आढावा घेतला. या वेळी सर्व सीसीटीव्ही सुस्थितीत असल्याची खातरजमा त्यांनी केली. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही चौबे यांनी केले आहे.
लोकसभा मतदारसंघातील सीलबंद ईव्हीएम यंत्रे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील मुख्य ‘स्ट्राँगरूम’ मध्ये ठेवण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्याकडे येथील बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. येथील बंदोबस्ताची आखणी तीन स्तरावर करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस तिसऱ्या म्हणजे सर्वात बाहेर शेवटच्या स्तरामध्ये तैनात आहेत. स्थानिक पोलिस अधिकारी, अंमलदार यांना तृतीय स्तरातून द्वितीय स्तराकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणाच्या मुख्य गेटवर सशस्र पोलिस अधिकारी व अंमलदार तैनात आहेत.
प्रथमस्तर बंदोबस्तासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी ठेवण्यात आली आहे. ‘इनर कॉर्डन मध्ये प्रोटोकॉलनुसारच प्रवेश दिला जात आहे. प्रवेश देण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले ओळखपत्र असल्याची खात्री केली जात आहे.
द्वितीय स्तरावर बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी ठेवण्यात आली आहे. द्वितीय स्तरातून प्रथमस्तरात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची खात्री करूनच त्यांना आत सोडले जात आहे. कोणतेही वाहन द्वितीयस्तर भेदून आत जाणार नाही, याबाबतची पुरेपूर काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
तृतीयस्तरात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मतमोजणी होईपर्यंत हा बंदोबस्त तैनात असणार आहे.
पोलिसांच्या गस्तीसाठी दोन वर्तुळाकार भाग करण्यात आले आहेत. गस्तीवरील अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणाहून पायी गस्त घालत आहेत. प्रभारी अधिकारी त्यांच्यावर सतर्कपणे लक्ष ठेवून आहेत. ‘स्ट्राँगरूम’साठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. ‘स्ट्राँगरूम’ रूममध्ये सर्व काही सुस्थितीत आहे का, सर्व अधिकारी, अंमलदार वेळेत हजर राहतात का, याची खातरजमा करण्याची सर्व जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाची असणार आहे.
सीलबंद ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आलेल्या बालेवाडी येथे चोख बंदोबस्त तैनात आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह केंद्रीय आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात आहेत. सीसीटीव्हीसह सर्व उपकरणे सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करण्यात आली आहे.
– विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड…











