न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- पिस्टलचा धाक दाखवुन लुटमार करणारे तीन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले असून ०१ लोखंडी पिस्टल, ०२ मोबाईल फोन, ०२ लोखंडी कोयते व गुन्हयात वापरलेली ०१ बुलेट मोटार सायकल असा एकूण १,३५,४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
१) आकाश मनोज लोट (वय-२२ वर्षे रा. ऐश्वर्याम हमारा सोसायटी, मोशी), २) सनी ऊर्फ अशुतोष अशोक परदेशी ऊर्फ रोकडे (वय- ३२ वर्षे रा. मिलींद नगर, पिंपरी), ३) अनिकेत गौतम शिंदे (वय-२४ वर्षे रा. पाटीलनगर, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हडपसर भागातील एका पिकअप गाडीवरील चालक (दि. २१) रोजी रात्री ते त्याच्या मित्रासह तळेगाव दाभाडे येथे माल सोडण्यासाठी जात होते. पुणे मुंबई जुना हायवे, खंडोबा माळ चौकासमोर गाडीचा टायर गरम झाला म्हणून ते रस्त्याचे कडेला थांबले. दरम्यान पहाटे ०५.०० वा. सुमारास एक निळ्या रंगाचे बुलेट मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी तीन इसमांनी त्यांना ते पोलीस आहेत असे सांगून त्यांना पिस्टल व कोयताचा धाक दाखवून त्यांचेकडून ७००० रु. लुटमार करून नेल्याने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
निगडी पोलीस ठाणे येथील तपास पथाकाच्या दोन टिम तयार करुन गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला. पथकाने परिसरातील सी.सी.टी.व्ही.फुटजे तपासाला सुरूवात करून आरोपींचा मार्ग काढत २५० ते ३०० सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले. आरोपी हे गुन्हा केल्यानंतर खेड शिवापुर पुणे परीसरात गेले असल्याचे निष्पन्न करून त्याप्रमाणे खेड शिवापूर येथील एका लॉज बाहेरून तपास पथकानी सापळा लावत त्यांना अटक केली आहे.
तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यातील आरोपी क्र. १ यांचेवर ०२, आरोपी क्र. २ याचेवर ०७, आरोपी क्र.०३ याचेवर ०२ गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी क्र. २ हा पिंपरी पोलीस ठाणे येथे पाहीजे आरोपी आहे.