- तर, दुसरीकडे क्रीडा संकुलाबाहेर पोलिस व्हॅनची वाहनांना धडक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मंगळवारी झाली. कडेकोट बंदोबस्त आणि प्रशासकीय सज्जता दिसून आली. मात्र, पहिल्या टप्प्यात मतमोजणीची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागली असल्याचे दिसून आले.
क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सकाळी सातपासूनच सज्जता होती. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजास सकाळी आठला सुरुवात झाली. साडेआठला टपाली मतमोजणी सुरू झाली. मतदान प्रतिनिधींसाठी स्वतंत्र, तर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी बालेवाडी येथे सुरु होती. मतमोजणी केंद्राच्या तिन्ही बाजूंना पार्किंगची व्यवस्था केली होती. स्पीकरवरून निकाल जाहीर करण्याची व्यवस्था केली होती.
पुणे, बारामती, शिरूर या लोकसभा मतदारसंघांच्या फेरीचे निकाल आले, तरी मावळमधील एकाही फेरीचा निकाल सकाळी दहापर्यंत आला नव्हता. निकालाला विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांची उत्कंठा वाढली होती. सोशल मीडियावर मावळची चर्चा सुरू होती. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी आणि व्यवस्था केली होती.
टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ मतमोजणी टेबल होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल होते. एकूण ११३ टेबलवर मतमोजणी केली. दुपारी तांत्रिक अडचणीमुळे निकाल जाहीर करण्याचे थांबविले होते. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला.
दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाबाहेर पोलिस व्हॅन चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे खासगी वाहनांना धडकून मोठा अपघात झाला. यामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले असून, महिला गंभीर जखमी झाली आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. मतमोजणीदरम्यान गोंधळ होऊ नये, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊ नयेत म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतल्यानंतर विजयी रॅली काढली. रॅली पुढे गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाड्या जात असताना अचानक पोलिसांच्या ताफ्यातील गाडी (एमएच १२ आरआर ५०२) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तेथून जात असलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना जोरदार धडक दिली. यात एक दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. त्याचवेळी तेथून जात असलेल्या काही नागरिकांच्या पायावरून गाडी गेली, तर काही नागरिकांना मागून धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. त्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. पण, नंतर नागरिकांचा रोष पाहून पोलिस व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात नेले.