- ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’च्या माध्यमातून आता थेट अलर्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :- जमिनीबाबत सातबारा अथवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती आता त्वरित कळणार आहे, त्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने काही नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हकात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येणार आहे. ई-मेल नोंदविला असल्यास त्यावरही याबाबतची माहिती मिळणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने नागरिकांना अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सात-बारा उतारा अथवा मिळकत पत्रिकांचे डिजिटायझेशन भूमी अभिलेख विभागाने केले आहे. याशिवाय फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्या जात आहेत. त्यापाठोपाठ जमिनींच्या मोजणीची नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-मोजणी व्हर्जन २ हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. परंतु, आजही जमिनीच्या मालकी हकासंबंधातील कुठल्या प्रकारची कार्यवाही सुरू आहे, याची माहिती घ्यावयाची असेल, तर त्यासाठी नागरिकांना ‘महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते. सतत पोर्टलवर जाण्याची आवश्यकता टाळणे, ही नागरिकांची नेमकी गरज ओळखून भूमी अभिलेख विभागाने आता ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सुविधेमुळे एखाद्या जमिनीमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास त्यांची माहिती संबंधित जमिनींच्या मालकास तत्काळ मिळणार आहे. त्यासाठी जमिनींच्या मालकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर नजर ठेवण्याची गरज राहणार नाही. ही सुविधा नागरिकांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली.