- शिक्षणासोबतच तरुणांनी विविध स्किल अंगीकारण्याची आवश्यकता – शंकर जगताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी केवळ मार्क महत्वाचे नाहीत. स्वतःमधील गुण ओळखून कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही, यासाठी बुध्दिमत्ता आवश्यक आहे. आपली बुध्दिमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखता आले, तर खऱ्या अर्थाने तुमच्या करिअर वाटा मोकळ्या होतील. गुणवत्तेबरोबर बुध्दिमत्ता महत्वाची असल्याची ठोस भूमिका माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना शनिवारी मांडली. तसेच करिअर आणि व्यक्तिमत्त्वासाठी विचार व आचाराची त्रिसूत्रीही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक सुरेश भोईर, अभिषेक बारणे, राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेविका उषा मुंढे, सविता खुळे, नीता पाडाळे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, भाजपचे दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, बेटी बचाव बेटी पढाओ संयोजक प्रीती कामतीकर, बुद्धीजीवी सेल संयोजक मनोजकुमार मारकड, भाजप महिला मोर्चा माजी अध्यक्षा उज्ज्वला गावडे, शेखर चिंचवडे, माजी स्वीकृत सदस्य देविदास पाटील, विनोद तापकीर, तानाजी बारणे, युवा मोर्चा संयोजक चिंचवड विधानसभा योगेश चिंचवडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, गणेश गावडे, कविता दळवी, पल्लवी पाठक, दिपाली कालापुरे, भाजपा शिक्षक आघाडी संयोजक प्रा.दत्तात्रय यादव, सहसंयोजक प्रा.संजय शेंडगे, प्रा.रावसाहेब यादव तसेच विद्यार्थी, पालक आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमांसंदर्भात रूची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करिअर धोक्यात राहिल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन करिअरची निवड करावी, असा सल्ला त्यांनी दिला.”
ते म्हणाले, “विद्यार्थी व पालकांनी परीक्षेत गुण किती मिळाले यावर गुणवत्ता ठरवू नये. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी गुण हे सर्वस्व नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना करिअर निवडण्याची आणि घडविण्याची मुभा द्यावी. त्याला जे क्षेत्र आवडते, त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर झाला म्हणजे जीवनामध्ये यशस्वी झाला असे नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये बुद्धिमत्ता असते. आपण निवडलेल्या क्षेत्रात ज्यांना आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायचे कळलेय, त्यांची वाटचाल अलौकिक बुद्धिमत्तेकडे चालू राहते.
ज्याचा मेंदू शाबूत आहे असा प्रत्येकजण बुद्धिमान आहे. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखणे म्हणजे स्वतःला ओळखणे होय. प्रत्येक विद्यार्थ्याने करिअर निवडताना स्वतःमध्ये डोकावून पाहावे. मन, बुद्धी, व्यक्तीमत्त्वाचा ओढा जिकडे ते करिअर करावे. स्कोप करिअरला नसतो, व्यक्तीला असतो. सगळे करिअर समान आहेत. स्वतःची बुद्धिमत्ता ओळखून करिअर ठरवावे. स्व:ची ओळख, त्यानुसार क्षेत्र निवडावे, त्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत व्हावे, ही विचारांची त्रिसूत्री तसेच नियमित योग करणे, स्वाध्याय, वर्क कल्चर या आचाराच्या त्रिसूत्रीमध्येच करिअर आणि व्यक्तिमत्त्वाचा रस्ता दडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शंकर जगताप म्हणाले, “भारत देश हा जगातील सर्वाधिक तरूण असलेला देश आहे. हेच तरूण भविष्यात विकसित भारत बनविणार आहेत. या तरुणांना दहावी आणि बारावीत असतानाच करिअर म्हणजे काय हे समजण्यासाठी तज्ञ्जांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी व पालकांसाठी अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनातूनच भविष्यातील भारत घडणार आहे. तरुणांनी शिक्षणासोबतच विविध स्किल शिकण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.