- पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून रहाटणीत पुन्हा वाहनांची तोडफोड..
- वाकड पोलिसांची केवळ बघ्याची भूमिका?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२४) :- वाकड परिसरात वाहन तोडफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. रहाटणी येथे दोघांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
रहाटणी येथील कौतिक हॉटेलसमोर पार्क केलैल्या वाहनांची तोडफोड झाली. नागरिकानी रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली होती. दरम्यान दोघांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. यामध्ये एका मालवाहतूक टेम्पोचाही समावेश आहे, याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनाच्या तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. ज्योतिबानगर काळेवाडी येथे दहा जुलै रोजी एका टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. अशा माथेफिरू टोळक्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. पोलिसांना न जुमानता गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. गाड्या फोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. रविवारी पहाटे पुन्हा एकदा कौतिक हॉटेल समोरील बाजूस रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची दोघा जणांनी तोडफोड केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुंड आणि गुन्हेगारी प्रवृतीला वेळीच रोखण्याचे आव्हान वाकड पोलिसांसमोर उभे राहिले आहे. केवळ बघ्याची भूमिका न घेता अशा अशा प्रवृत्ती ठेचून काढाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. वाहने फोडणारे कोण आहेत? त्यांनी असे का केले? याबाबत वाकड पोलिसांशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.


















