न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आज शनिवार (दि. ४) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत भाजपच्या वतीने प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यात अ क्षेत्रिय कार्यालयातून शर्मिला बाबर, ब क्षेत्रिय कार्यालयातून करुणा चिंचवडे, क क्षेत्रिय कार्यालयातून यशोदा बोइनवाड, ड क्षेत्रिय कार्यालय शशिकांत कदम, इ क्षेत्रिय कार्यालय सुवर्णा बुर्डे, फ क्षेत्रिय कार्यालय योगीता नागरगोजे, ग क्षेत्रिय कार्यालय अर्चना बारणे, ह क्षेत्रिय कार्यालय अंबरनाथ कांबळे यांच्या अर्जांचा समावेश आहे.
पक्षीय बलाबलानुसार प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व आहे. त्यामुळे महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांवर भाजपचेच अध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे ९ तारखेला निवडणुकीच्या दिवशी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकताच शिल्लक राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही शिवसेनेला झुकते माप मिळेल व एखाद्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळेल, असा कयास होता. परंतु, युती ही केवळ लोकसभेपुरतीच राहिली. शिवसेनेला या यादीत स्थान मिळाले नाही. अपक्ष आघाडीलाही वाटण्याच्या अक्षताच वाट्याला आल्या आहेत.











