न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२४) :- कंत्राटी कामगार प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आणि चार नव्या श्रमसंहिता रद्द कराव्यात या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने शनिवारी (दि. ३ ऑगस्ट) कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जेष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी दिली.
शनिवारी (दि.३ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पिंपरी, संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे मेळाव्याचे उद्घाटन होणार असून समारोप दुपारी चार वाजता होणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार सचिन अहिर, विनोद निकोले, शशिकांत शिंदे आणि राज्यातील सर्व कामगार संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ कामगार नेते इंदू प्रकाश मेनन, चंद्रकांत तिवारी, वसंत पवार, अनिल रोहम, गणेश दराडे आदी उपस्थित होते.















