- जुन्या जाणत्या नेत्यांना आमदारकीची ओढ..
- पक्षाची समुद्रात रुतलेली नौका कोण ओढणार?; कार्यकर्ते संभ्रमात..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- तोंडावर आलेली विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणूकीची शहरातील सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. इच्छुक उमेदवारांच्या नावावर देखील तिकडे खल सुरु आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा पिंपरी चिंचवड शहराचा अजून शहराध्यक्षच ठरत नाही. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
पक्षात असणाऱ्या जुन्या जाणत्या नेत्यांना ‘अभी नही तो कभी नही’ या उक्तीप्रमाणे आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. समुद्रात रुतलेली नौका कोण ओढणार? अशी अवस्था शहरात ‘दादा’ गटाची झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकताच शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक, आजी माजी ३० पदाधिकाऱ्यांनीदेखील शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शहर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सेनापतीच उरला नाही. तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उरकला तरीही नवीन शहराध्यक्षाचे नाव अंतिम होत नाही.
दरम्यान पडझड रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरात येत कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. अध्यक्ष कोणाला करायचे याची चाचपणी सुरु असल्याचा निर्वाळा देत लवकरच अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असेही आश्वासन बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. मात्र अजूनही त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पक्षाच्या पुढील भवितव्यासाठी ही निश्चितच नुकसानकारक गोष्ट आहे, अशी कुजबुज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या खासगीत सुरु आहे.














