न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- भारताच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.
स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले.















