- आमदार सुनील शेळकेंनी ठेवलं नेमकचं वर्मावर बोट..
- स्थानिक भाजपला करून दिली ती आठवण..
- ‘पुन्हा आमदारकीला उभ रहायचं की नाही ते मावळची जनता ठरवेल’ – आ. शेळके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- मावळ विधानसभेच्या जागेरून भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु आहे. तालुक्यात आमचा पक्ष मोठा म्हणून मावळच्या जागेवर आमचाच दावा आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ तालुक्याची जागा भाजपला मिळावी, यासाठी नेत्यांना गळ घालण्यात येणार असल्याचेही सांगितले जातेय. यावर मात्र, मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
एका माध्यम समूहाला प्रतिक्रिया देताना आ. सुनील शेळके म्हणाले, ”लोकसभेला माझ्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळून महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. त्याबद्दल कोणी शंका घेत असतील किंवा आम्हालाही जागा मिळावी याकरिता कोणी आग्रही असेल तर, ते मला योग्य वाटत नाही,” असा टोला त्यांनी स्थानिक भाजपच्या नेत्यांना हाणला आहे.
”मावळची जागा भाजपला सुटली तर, युतीचा धर्म पाळला जाईल. महायुतीतले ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील ते मला मान्य असेल, असेही ते म्हणाले. तसेच इतर कोणी निवडणुकीची तयारी करीत असेल तर त्यांचे स्वागत आहे. कारण लोकशाहीत संविधानाने सर्वांना आपापल्या इच्छा पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे”, असेही ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ”पुन्हा आमदारकीला इच्छुक राहण्यासाठी मावळच्या जनतेला विचारून निर्णय घेण्यात येईल. मला अजितदादांनी भरभरून प्रेम दिले आहे. राजकारणातमध्ये भविष्यात काय होईल? हे मला माहीत नाही. परंतु, मी अजितदादांची साथ कधीही सोडणार नाही. कायम त्यांच्या सोबत राहील.”











