- मोठा आर्थिक दंड लावूनही उरकेना पुलाचं काम..
- वाहतूक रहदारीचा खोळंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- पिंपरीगाव व पिंपळे सौदागर या भागास जोडणाऱ्या पवना नदीवरील पुलाचे काम कासव गतीने सुरू आहे. हे काम तब्बल दोन वर्षापासून रखडले आहे. दोन वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने दिवसाला २५ हजारांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. तरीही कामास गती नसल्याचे चित्र आहे.
काम पूर्ण करण्यासाठी स्थापत्य विभागाने संबंधित ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. कामास विलंब केल्याने ठेकेदाराला प्रतिदिन १ हजार रुपये दंड आकारण्यात आला. असे २२ सप्टेंबर २०२२ ते ३१ मे २०२३ पर्यंत एकूण २५२ दिवसांचा २ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्या मुदतीमध्येही काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर १ जून २०२३ ते २५ मे २०२४ पर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली. त्यात प्रतिदिन ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. एकूण ३६० दिवसांचा १८ लाखांचा दंड ठेकेदारांकडून वसूल करण्यात आला आहे. तसेच, साहित्याची भाववाढ गोठविण्यात आली आहे. तरीही, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे १ जून २०२४ पासून काम संपेपर्यंत प्रतिदिन २५ हजारांचा दंड ठेकेदाराकडून आकारला जात आहे.
पुलाचे काम दोन वर्षापासून रखडल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद पुलावर वारंवार वाहतूक रहदारीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे समांतर पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी महापालिकेकडे पाठपुरावाही करीत आहेत. दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनीही कामाची पाहणी केली. मात्र, कामाने गती घेतली नसल्याचे चित्र आहे.
पिंपरीगाव व पिंपळे सौदागरला जोडणारा पवना नदीवर हा पूल आहे. मात्र, वाहतूक रहदारी वाढल्याने हा पूल अरुंद ठरत आहे. त्यामुळे या पुलावर वारंवार वाहतूककोंडी होत आहे. या पुलास समांतर पूल महापालिकेकडून बांधण्यात येत आहे. त्यासाठी ओएस असिस्टीप स्तुप एजन्सी सल्लागार आहे, हा १०० मीटर लांबीचा आणि १२ मीटर रुंदीचा पूल आहे. त्यासाठी १३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
बांधकाम ठेकेदार व्ही. एम. मातेरे इन्फ्रा प्रा. लि. यांना वारंवार नोटिसा देऊनही या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. प्रथम दिवसाला १ हजार त्यानंतर दिवसाला ५ हजार दंड करण्यात आला. तरीही काम पूर्ण न झाल्याने आता दिवसाला २५ हजार रुपये दंड आकारला जात आहे. ऑगस्ट अखेरपर्यंव काम पूर्ण करण्याची तंबी संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे.
– प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता…











