न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- चिंचवड येथे पार पडलेल्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला असून पुरुष गटातून सागर वाघमारे, महिला गटातून पुष्कर्णी भट्टड, जेष्ठ नागरिक गटातून संजय थिटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तसेच नव प्रगती मित्रमंडळ यांच्या सहकार्याने कै.सो. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र, चिंचवड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन दि.२९ ते दि.३१ जुलै २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष भारत देसरडा, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे, अरूण कडूस, माजी नगरसदस्य आप्पा बागल, स्पर्धा व्यवस्थापक अविनाश कदम, विनोद देसाई, सुदाम दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून अभिजीत चिपणकर यांनी द्वितीय क्रमांक, हरून शेख यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात द्वितीय क्रमांक मेधा मटकरी, तृतीय क्रमांक श्रुती वेळेकर तसेच ज्येष्ठ नागरिक गटामध्ये द्वितीय क्रमांक समीर एस. शेख ,तृतीय क्रमांक सनी माछरेकर यांनी पटकावला. तर ‘ब्रेक टू फिनिश’ चा मान अनुराग दुबळे, सचिन परदेशी यांनी मिळवला. ही स्पर्धा पुरुष गट, महिला गट, ज्येष्ठ नागरिक या तीन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण ३२८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.











