- या तारखेपासून तब्बल पाच दिवस पाणीपुरवठा राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- देहूगाव गावठाणात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची गळती बंद करण्यासाठी येत्या गुरुवारपासून (दि. ८) पाच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चार ते पाच दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन देहूनगर पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
देहू गावठाणात राहणाऱ्या नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून गेल्या काही वर्षांपासून गळती होत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. ही गळती थांबविण्याचे काम करण्यासाठी चार, पाच दिवसांचा कालावधी लागत होता. जर पाणीपुरवठा बंद ठेवला तर गावठाणातील नागरिकांचे पाण्याविना होणारे हाल टाळण्यासाठी नगरपंचायतीने हे काम थांबवले होते. परंतु, टाकीतून गळतीचे प्रमाण वाढल्याची बाब नगरसेवक प्रवीण काळोखे आणि योगेश परंडवाल यांनी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर त्वरित टाकीची पाणी गळती बंद करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
त्या अनुषंगाने देहू गावठाणातील हगवणेआळी, चव्हाणनगर, कुंभारआळी, बाजारपेठ, सुंदर गल्ली तसेच सुतार आळी या गावठाणातील पाणीपुरवठा गुरुवार (दि. ८) ते सोमवार (दि. १२) असे पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन देहू नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.