न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२४) :- शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, तसेच शासनाचा हेतू साध्य होऊन प्रशासन गतिमान होण्यास चालना मिळते, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात महापालिकेच्या लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी विभागीय परिक्षेच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, संदीप खोत, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे चे विभागीय संचालक दगा मोरे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, सेवानिवृत्त महानगरपालिका आयुक्त सुधीर राऊत, सेवानिवृत्त महानगरपालिका सह आयुक्त शिवाजी दौंडकर, माहिती जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षा या प्रशासनात कार्यक्षमता आणि गतिमानता वाढविण्यासाठी महत्वाच्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक भर घालण्यासाठी देखील महत्वाच्या आहेत,असेही आयुक्त सिंह म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा( सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येते. त्यानुसार आज दि. ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ आणि १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० अस्तित्वात आल्यापासून महापालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापनेवर कोणत्याही पदावर कार्यरत असलेल्या किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहित केलेली विभागीय परीक्षा उतीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे यांच्याकडून विभागीय परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण सत्राचे आयोजन महापालिकेच्या प्रशासन विभाग आणि कामगार कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज झालेल्या प्रशिक्षण सत्रात सेवानिवृत्त महानगरपालिका आयुक्त सुधीर राऊत यांनी महाराष्ट्र महानगपालिका अधिनियम : प्रकरण २, महानगरपालिकेची रचना व अनुसूची ड प्रकरण १, प्रकरण ३, महापालिका, स्थायी समिती, परिवहन समिती व अन्य समित्या याबाबत मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त महानगरपालिका सह आयुक्त शिवाजी दौंडकर यांनी किमान वेतन अधिनियम याबाबत तर कर सल्लागार अमोल काळे यांनी वस्तू व सेवा कर याबाबत मार्गदर्शन केले.














