- रात्री अपरात्री बाहेर धोकादायकरित्या फिरणे टाळा – डॉ. धनंजय वर्णेकर..
- आयआयबीएम कॉलेज आणि चिखली पोलीस ठाण्याच्या वतीने ‘कायदेविषयक मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- मुलींना वेगवेगळ्या समस्यातून मार्ग काढीत पुढे जावे लागते. त्यामुळे अनोळखी लोकांवर फार विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना विचार करूनच करावा. बदलापूर प्रकरणामुळे मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत. कठीण काळात तेच उपयोगी पडणार आहेत. कॉलेजमधील अध्यक्ष, प्राचार्य, विभागप्रमुख आणि शिक्षकवर्गाने समन्वय साधावा, असं आवाहन चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी करीत ‘कायद्याचे नियम पाळा, सतर्क रहा’, अशा सूचनाही केल्या.
चिखलीतील आयआयबीएम कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. २३) रोजी विद्यार्थिनींना ‘कायदेविषयक आणि स्वसंरक्षणाचे धडे’ यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास दामिनी पथक महिला अधिकारी चौगुले, कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख अनिकेत वंजारी, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, कॉलेजचा शिक्षक वर्ग आणि तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले, मोबाईलच्या माध्यमातून आज अनेक गुन्हे घडत आहेत. मुलांप्रमाणेच मुलीसुद्धा स्पीडमध्ये गाडी चालवतात. एका बाईकवर दोघे तिघे बसून रात्री अपरात्री बाहेर धोकादायकरित्या फिरतात. जास्त वेळ हॉटेलमध्ये बसून राहतात. अशाने मुलींची सुरक्षा धोक्यात येऊ पाहते. त्यामुळे मुलींनी स्वतःला स्वयंशिस्त घालून घ्यावी. कॉलेजचे सर्व नियम पाळावेत.
चिखली दामिनी पथकाकडून हॉस्टेलमध्ये रहाणाऱ्या विद्यार्थीनींनी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू नये. तसेच अनोळखी लोकांशी बोलू नये. अडचण आल्यास संपर्क साधण्याच्या सूचना केल्या.
प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ मॅडम यांनीही मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे? कोणत्याही क्षणी अडचण आल्यास कॉलेज प्रशासनाशी किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. अभ्यास करून आपलं करिअर उज्वल करून आई वडिलांचे नाव अभिमानाने उंचवावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. गरिमा मलिक यांनी तर, प्रो. अनुभव बाजपेई, प्रो. संदीप जाधव आणि शाहबाज काझी यांनी नियोजन केले. विभागप्रमुख अमोल भागवत यांनी विद्यार्थिनीना सतर्क रहा व धाडसाने संकटाला सामोरे जावा, तसेच अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, असे आवाहन करीत मान्यवरांचे आभार मानले.