- शिवसेनेचे हरेश नखाते यांची काळेवाडीतील शाळा व्यवस्थापकांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- बदलापूरच्या घटनेनंतर शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत लहान मुलींची काळजी घेण्यासाठी पुरुष कर्मचारी नेमल्याने ही घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये मुलींच्या काळजीसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी केली आहे.
यासंदर्भात हरेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि पालकांच्या शिष्टमंडळाने काळेवाडी प्रभागातील सर्वच शाळा व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. यावेळी विभागप्रमुख गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, बाळासाहेब येडे, कृष्णा येळवे, सुंदर खंडागळे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटल आहे की, ‘बदलापूर मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेला शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. जर पुरुष कर्मचाऱ्यांच्या ऐवजी त्या ठिकाणी महिला कर्मचारी त्या चिमुकल्या मुलींच्या काळजीसाठी शाळेने नेमली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती. या घटनेतून बोध घेत अशी घटना आपल्या परिसरातील शाळांमध्ये घडू नये यासाठी सर्व शाळेमध्ये लहान मुलींच्या देखभाल व काळजी वाहण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे’, अशी आग्रही मागणी हरेश नखाते यांनी या निवेदनामार्फत केली आहे.















