न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- देहूगाव नगरपंचायत हद्दीत घराच्या टेरेसवर, तसेच मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरची संख्या अठरा आहे. टॉवरवर धोक्याची सूचना न लावणे; तसेच टॉवरवर धोकादर्शक लाल दिवे न लावणे या कारणांमुळे हे टॉवर अनधिकृत ठरत असल्याचे देहूनगर पंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे.
मोबाईल हा सध्या मानवी जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलधारकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. या मोबाईलधारकांना उत्तम सुविधा देण्यासाठी जागोजागी टॉवर उभारलेले दिसून येते. देहूगावातही अनेक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारलेले आहेत. त्यापैकी सुमारे अठरा टॉवर अनधिकृत असल्याचे देहुनगर पंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे.
टॉवर उभारताना त्याच्यावर धोक्याचा इशारा असलेली सूचना लावणे कायद्याने बंधनकरारक आहे; परंतु देहूतील काही मोबाईल टॉवरच्या परिसरात धोक्याचा इशारा देणारे सूचना फलक, टॉवरवर लाल दिवे लावलेले दिसून येत नाहीत. देहगावातील एकूण अठरा मोबाईल टॉवरपैकी फक्त सहा मोबाईल टॉवरची नोंद करण्यासाठी कागदपत्र प्राप्त झाले आहेत. तर अनेक टॉवरची नोंद ही ऑनलाइन केली असली तरी त्यात अनेक त्रुटी असल्याने नोंद झाली नसल्याची माहिती देहूगाव पंचायत प्रशासनाने दिली आहे.
मोकळ्या जागेत अथवा इमारतीवर मोबाईल टॉवर बसविताना स्थानिक संस्था, संबधित विभाग, आकाश चिन्ह विभाग तसेच टॉवर शेजारी राहणाऱ्या रहिवाशांची परवानगी आवश्यक असते. पर्यावरण संरक्षण कायदा १९९६ नुसार शैक्षणिक संस्था, रुग्णालयाच्या परिसरात टॉवर उभारू नयेत, असे अनेक निर्देश देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक संस्था व निवासी भाग टॉवर पासून शंभर मीटर क्षेत्रात येत असेल तर परवानगी नाकारावी असे निर्देश आहेत; परंतु देहूगावमध्ये असे निर्देश धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभे करण्यात आले आहेत. कंपनी वा सेवा देणारे टॉवर यामुळे होणाऱ्या हानी वा दुखापतीस जबाबदार धरले जातील व त्याची नुकसान भरपाई देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे; मात्र या अनधिकृत टॉवरवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष असणार आहे.
देहनगर पंचायत हद्दीत अनधिकृत अठरा मोबाईल टॉवर आहेत; परंतु ते अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शासनाने काही अटी व शर्ती घातल्याने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सील करण्याची कारवाई देहूनगर पंचायत करू शकत नाही. असे असले तरी ते अनधिकृत टॉवर करास पात्र आहेत. टॉवर कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षापासून कर भरलेला नाही. त्यामुळे संबंधितांनी मोबाईल टॉवरचा कर लवकरात लवकर भरावा, यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत; परंतु आद्यापही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.
– ज्ञानेश्वर शिंदे, कर संकलन अधिकारी, देहूनगर पंचायत…