न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२४) :- खराडीतील नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचे शिर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोपीचा शोध चंदननगर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नाही.
खराडी परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शिर धडावेगळे करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्ष असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.