न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- जबरी चोरी आणि वाहन तोडफोडीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी सांगवी पोलीस चक्क वऱ्हाडीच्या वेशात लग्नमांडवात पोहोचले आणि नातेवाईकाच्या लग्नात आलेल्या आरोपीची मांडवातून थेट तुरुंगात रवानगी झाली.
ऋतिक उर्फ फिरंग्या श्रीधर सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाहन तोडफोडीसह जबरी चोरीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असून हत्येचा प्रयत्नसारखा गंभीर गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल आहे.
काही महिन्यांपूर्वी जुन्या सांगवीत वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ऋतिक उर्फ फिरंग्या हा आरोपी होता. तो पोलिसांना नेहमी चकवा देत फरार होत असे. सोमवारी आरोपी ऋतिक उर्फ फिरंग्या याच्या नातेवाईकाच्या मुलीचे लग्न होते. आरोपीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यामुळे तो येणार असल्याची खात्री पोलिसांना होती. त्यानुसार साध्या गणवेशात पोलीस विवाहस्थळी वऱ्हाडी म्हणून दाखल झाले.
अचानक पोलिसांनी त्याला घेराव घालत लग्नमांडवातून अटक केली. याप्रकरणी दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.











