न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो स्टेशनचे नकाशे अखेर राज्य सरकारने मंजूर करून पाठविले आहेत. त्यामुळे मेट्रोचे स्टेशन कुठे असणार, कोणत्या परिसरातील रहिवाशांना चार ‘एफएसआय’चा फायदा मिळणार, हे कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांवर पुणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा, तो सुसह्य व्हावा, यासाठी मेट्रोमार्गावर सरसकट पाचशे मीटरच्या परिसरात चार ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आला होता. त्यामध्ये बदल करून त्याऐवजी स्टेशनपासून पाचशे मीटरच्या परिसरात हा ‘एफएसआय’ द्यावा, असा सुधारित प्रस्ताव महापालिकेने पाठविला होता. त्यास राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. तसेच, त्यावर हरकती व सूचना मागविण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, नकाशांअभावी स्टेशन कुठे असणार, कोणत्या परिसराला वाढीव ‘एफएसआय’चा लाभ मिळणार, स्टेशनच्या मध्यापासून की सीमाभिंतीपासून पाचशे मीटरचे अंतर ग्राह्य धरण्यात येणार आहे, हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे नागरिकांना हरकती व सूचना देताना अडचणी येत होत्या. महापालिकेने स्टेशनच्या ठिकाणांचे नकाशे सरकारला वेळेत सादर न केल्याने हा गोंधळ झाला होता.
मध्यंतरी महामेट्रोने महापालिकेकडे आणि महापालिकेने राज्य सरकारकडे मेट्रो स्टेशनचे नकाशे मंजुरीसाठी पाठविले होते. दोन दिवसांपूर्वीच सरकारने या नकाशांना मान्यता दिली आहे. हे नकाशे नागरिकांना हरकती व सूचनांसाठी महापालिका, नगररचना कार्यालय आणि महामेट्रोच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार नागरिकांना आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
मेट्रो स्टेशनच्या सीमाभिंतीपासूनच्या पाचशे मीटरच्या परिघातील इमारतींना वाढीव ‘एफएसआय’ मिळणार आहे. वनाज ते रामवाडीदरम्यानच्या मार्गावर एकूण १६ स्टेशन आहेत. तर, पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर १४ स्टेशन आहेत. अशा सुमारे ३० स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील सर्वांना वाढीव ‘एफएसआय’चा फायदा मिळणार आहे. मेट्रो स्टेशनच्या नकाशांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ते लवकरच नागरिकांना हरकती व सूचनांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागाचे सहसंचालक अविनाश पाटील यांनी दिली











