न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १७ सप्टेंबर २०२४) :- गणपती अथर्वशीर्ष पठण, आरती आणि त्यानंतर ” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ” च्या गजरात येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या नऊ दिवसीय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. गणेशभक्तांच्या उत्फुर्त प्रतिसादात गेल्या सहा वर्षांपासूनची परंपरा लाभलेल्या या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रारंभ आमदार अश्विनी जगताप यांच्याहस्ते गणेशाच्या आरतीने करण्यात आला. तसेच ” इच्छा दान गणेशमुर्ती ” उपक्रमांतर्गत परिसरातील एक हजार गणेशभक्तांना भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याहस्ते शाडुमातीच्या गणेशमुर्ती प्रदान करण्यात आल्या.
नऊ दिवस चाललेल्या या गणेशोत्सवात समाजातील विविध घटक आणि वंचित महिलांना प्राधान्याने निमंत्रित करुन त्यांना सकाळी आणि संध्याकाळी श्री गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला. या उपक्रमात डॉक्टर, नर्स, शिक्षक, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, ब्रह्मवृंद, सफाई कामगार महिला, विधवा तृतीयपंथी तसेच दिव्यांगांना समाविष्ट करुन वेगळा पायंडा पाडण्यात आला.
समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या नऊ दिवसीय गणेशोत्सवाबाबत माहिती देताना उन्नतीच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे यांनी सांगितले की, निसर्गाचा समतोल साधण्याचा एक भाग म्हणून सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर आम्ही उन्नतीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. सामाजिक समरसतेचा एक भाग म्हणून समाजातील विविध घटक आणि वंचित महिलांच्या हस्ते गणेशाची आरती करुन त्यांचाही सन्मान कसा होईल यादृष्टीने आम्ही वाटचाल करीत आहोत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीने परिसरातील वाहतुकीला कसलाही अडथळा यायला नको यादृष्टीने उन्नती कार्यालयाच्या आवारात कृत्रिम हौदामध्ये ढोल ताशाच्या गजरात व गणेशभक्तांच्या उत्फुर्त सहभागात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.