न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आता सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार आहे. अनेक नव्या विभागांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारी रुग्णालयाजवळील जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असून, लवकरच आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात महापालिकेचे वायसीएम हे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. साडेसातशे खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणही दिले जाते सर्वांत मोठे रुग्णालय असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांची वाढती संख्या पाहता, रुग्णालयाची जागा अपुरी पडत आहे. यामुळे रुग्णालयाच्या शेजारील दीड एकर जागेत सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. संबंधित जागेवर सध्या निराधारांसाठी निवासी घरांचे आरक्षण आहे. ही जागा प्रस्तावित रुग्णालयासाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
या नवीन रुग्णालयात दुर्धर आजारांवरील उपचारांसोबतच नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, कार्डिओलॉजी, कॅथलॅब असे विविध विभाग सुरू केले जाणार आहेत. वायसीएम रुग्णालयातील आपत्कालीन विभाग, अतिदक्षता नवजात शिशू विभाग, अतिदक्षता विभाग यांसारख्या विभागांमध्ये नेहमीच गर्दी असते. त्यामुळे नवीन रुग्णालय झाल्यानंतर या विभागांचाही विस्तार होणार आहे. वायसीएम रुग्णालयाची सध्याची क्षमता ७५० खाटांची, तर नवजात शिशू अतिदक्षता विभागाची क्षमता ४० आहे. मात्र, दररोजची रुग्णसंख्या पाहता, यंत्रणा व सुविधा कमी पडत आहेत. अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी संबंधित विभाग व तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता रुग्णांना ‘ससून’ला जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रस्तावित सुपरस्पेशालिटी रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
वायसीएम रुग्णालयात सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी दिला होता. त्यासाठी रुग्णालयाच्या शेजारील जागा निश्चित करण्यात आली. याबाबतच्या परवानगीसाठी नगरविकास विभागाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत त्याबाबत उत्तर आल्यानंतर अंतिम आराखडा करण्याचे काम हाती घेण्यात येईल.
– डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी…