न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- निकृष्ट कामे करणाऱ्या ११ ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकले असतानाच त्या पाठोपाठ त्या कामांची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याबाबत महापालिकेच्या २५ उप व कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. अनपेक्षितपणे या नोटिसा मिळाल्याने अभियंत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागातील रस्ते दुरुस्ती, ब्लॉक, पदपथ करणे, मातीचे जॉगिंग ट्रॅक बनविणे, उद्यानातील दुरुस्ती करणे यासारखी कामे घेताना ११ ठेकेदारांनी १४ वेगवेगळ्या कामात तब्बल ४५ टके कमी दराने निविदा भरल्या होत्या. इतक्या कमी दरात कामे घेतल्यानंतर त्याचा दर्जा, गुणवत्ता राहिला नाही. ती कामे कमी आणि निकृष्ट दर्जाची केली गेली असल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. आयुक्त शेखर सिंह यांनी त्या ११ ठेकेदारांच्या १४ कामांचा दर्जा तपासून घेण्यास दक्षता विभागास सांगितले.
दक्षता विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून कामांच्या दर्जाची तपासणी करून घेतली. सीओईपीने केलेल्या तपासणीत काम निकृष्ट दर्जाचे तसेच, केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दर्जाहीन काम करणाऱ्या दोषी ११ ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ठेकेदारांकडून निकृष्ट झालेल्या कामाचा दुप्पट खर्च वसूल करण्यात येणार आहे. त्या ११ ठेकेदार निकृष्ट कामे करत असतानाही डोळे झाकून काम पाहणाऱ्या सुमारे २५ उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेची विकासकामे निकृष्ट होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित २५ उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. त्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.