न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- बीडमध्ये बनावट नोटांची छपाई करून पुण्यात चलनात आणणाऱ्या बीडच्या आरोपीला बीड शहर पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १००, २००, ५०० रुपयांच्या बनावट साडेआठ हजार रुपयांच्या नोटाही जप्त केल्या आहेत, तसेच एक गावठी कट्टाही त्याच्याजवळ आढळला. बनावट नोटांसोबत ही टोळी गावठी कट्टेही विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
प्रवीण गायकवाड (वय २२, रा. बीड, ह.मु, पुणे), असे अटक आरोपीचे नाव आहे. १६ सप्टेंबर रोजी बीड शहर पोलिसांनी बनावट नोटांचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात अगोदरच एका अल्पवयीनसह दोघांना ताब्यात घेतले होते, तसेच यातील मनीष क्षीरसागर हा म्होरक्या असून, कारवाईनंतर तो फरार झाला होता. त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला असता गायकवाडचे नाव समोर आले.
मनीषने प्रवीणकडे गावठी कट्टा दिला, तो पुण्यातील एका व्यक्तीला ८० हजार रुपयांना विक्रीही केला होता; परंतु तो खराब निघाल्याने त्याने परत केला. त्यामुळे हा कट्टा प्रवीणच्या खोलीवर सापडला. प्रवीणचा नातेवाईक पुण्यातील एका कॉलेजमध्ये जॉब करतो. तेथील मुलांना मदत करण्याचा बहाणा हा प्रवीण करत होता. याच माध्यमातून त्याने नोटा चलनात आणल्या होत्या.
बनावट नोटा प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न झाले असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून बनावट साडेआठ हजार रुपये आणि गावठी कट्टा जप्त केला आहे.
– शीतलकुमार बल्लाळ, पोलिस निरीक्षक, बीड शहर…










