न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महापालिकेतील दोन सहायक आयुक्त आणि दोन प्रशासन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. महापालिकेतील प्रतिनियुक्त्तीवर आलेल्या मुख्याधिकारी केडरच्या सहायक आयुक्तांची माहिती नगर विकास विभागाकडून मागवली होती. त्यापैकी पाच ते सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या सहायक आयुक्तांमधील विनोद जळक, नीलेश देशमुख, सुचिता पानसरे, अंकुश जाधव यांची बदली करण्यात आली आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांची कोल्हापूर महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर, स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचे सहायक आयुक्त विनोद जळक यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. तर, क्षेत्रीय अधिकारी असलेल्या प्रशासन अधिकारी सुचेता पानसरे यांची पनवेल महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. तर, प्रशासन अधिकारी अंकुश जाधव यांची नवी मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे.
कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख, ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, विनोद जळक यांचा महापालिकेत तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव आळंदी महापालिकेत मुख्याधिकारी होते. त्यानंतर ते वर्षभरापूर्वी पिंपरी- चिंचवड महापालिकेत रुजू झाले होते.










