न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०१९) :- पवना धरणात कमी पाणीसाठा असल्याने तो पुढील २ महिने पुरेसा रहावा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सोमवार (दि. ६) पासून पाणीकपात सुरू केली आहे. ती नैसर्गिक बाब आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस टीका करीत राजकारण करीत आहे, असे प्रत्युत्तर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि पालिका गटनेत्यांना विश्वासात न घेता पालिका प्रशासन व सत्ताधा-यांनी अचानक शहरावर दिवसाआड पाणीकपात लादली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दता साने यांच्यासह सर्वच विरोधी गटनेत्यांनी केली होती. त्या संदर्भात उत्तर देताना पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, पवना धरणातील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे झपाट्याने घटत आहे. जलसंपदा विभागाने पालिकेस केलेल्या सूचनेवरून कपात करण्यात आली आहे. कपात न केल्यास शहराला पावसाळ्यापर्यंत पाणी पुरणार नाही म्हणून हा निर्णय घेतला आहे. जानेवारीत सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्यांना कपातीबाबत सुचीत करण्यात आले होते. त्यामुळे गटनेत्यांना विश्वासात घेतले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच, सर्व पदाधिकारी निवडणूक प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे प्रशासनाने कपातीचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. तर, लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पालिकेच्या प्रत्येक कामाबाबत आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
शहरातील कच-यासंदर्भातील टीकेवर ते म्हणाले की, घरोघरचा कचरा संकलनाचे काम १ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. पलिकेने बहुतांश कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने नालेसफाईस थोडासा विलंब झाला. पावसाळ्यापूर्वी म्हणजे या महिन्या अखेरीपर्यंत शहरातील सर्व नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी दालन विस्ताराबाबत माझ्याशी अद्याप एकदाही चर्चा केलेली नाही. ते केवळ प्रसिद्धीसाठी पत्रक काढतात, असे पवार म्हणाले. मागील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी उपमहापौरांचे दालन मागितले होते. त्यापूर्वीच तत्कालिन माजी उपमहापौर शैलजा पवार यांनी दालनाचा ताबा घेतला होता. त्यामुळे ते दालन देता आले नाही, असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.











