- महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कर्मचारी कृति समितीची बैठक संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ९ मे २०१९) :- महाराष्ट्र राज्य आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृति समितीची आरोग्य सेवा संरक्षण व हक्कासाठी आघाडीची बैठक (दि. ३ मे २०१९) रोजी ठाणे, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्या व त्याची सद्यस्थिती यावर सविस्तर चर्चा करून, पुढील निर्णय घेण्यात आले.
१. प्रलंबित मागण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी मंगळवार दि. ४ जून २०१९ रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे निदर्शनाचा कार्यक्रम घेण्याचे ठरले. यात जास्तीत जास्त ताकदीने सर्व संघटनांनी सहभाग नोंदवावा.
२. आरोग्य मंत्र्याबरोबर झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आरोग्य विभागाकडून कोणता प्रस्ताव गेला याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.
३. १७ जून २०१९ रोजी महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरुवात होणार आहे. आचारसंहिता २३ मे रोजी संपात असल्याने दरम्यानच्या काळात प्रलंबित मागण्यावर पाठपुरावा करावा व लढ्याचीहि तयारी करावी असा निर्णय झाला.
४. दि. ७ व ८ मे २०१९ रोजी मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कृती समिती सदस्य पुन्हा मुंबई येथे येण्याचा निर्णय घेण्यात आला.
५. प्रलंबित मागण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांना निवेदन देण्याचे ठरले.
६. सर्व जिल्ह्यातील आमदारांना देखील निवेदन देऊन, विधानसभेत आपल्या प्रश्नावर लक्षवेधी व तारांकित प्रश्न विचारण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.
वरील निर्णयानुसार दि. ७ मे २०१९ रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री व प्रधान सचिव आरोग्य खाते यांच्या कार्यालयात समक्ष भेटीने निवेदन देण्यात आले. तसेच आरोग्य अभियान संचालक व सार्वजनिक आरोग्य खाते मुंबई यांच्याशी दि. ३ मे व ७ मे २०१९ रोजी सखोल चर्चा करण्यात आली. तरी सर्व जिल्हा संघटनांनी ४ जून २०१९ च्या मोर्चाची जोरदार तयारी करावी व आपापल्या जिल्ह्यातील आमदारांना भेटून निवेदने सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











