न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२४) :- फुगेवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाण्यासाठी कित्येक वर्ष रेल्वे रूळ क्रॉस करून जावे लागत होते. परंतु रेल्वे प्रशासनाने तो मार्ग सुद्धा बंद करण्याचा घाट घातला होता. परंतु, आमदार अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करून तात्पुरता मार्ग ये-जा जाण्यासाठी ठेवला.
फुगेवाडी ग्रामस्थांनी हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. त्यांना आमदार अण्णा बनसोडे यांची साथ मिळाली. दोघांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग निर्माण करण्यासाठी दिलेला लढा यशस्वी झाला.
आयुक्त शेखर सिंह यांनी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाणाऱ्या पुश ब्रिजच्या कामाच्या निविदेस मान्यता दिली. त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा करीत पालिका प्रशासन व आ. अण्णा बनसोडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.