- स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींसोबत अश्लील कृत्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींसोबत गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे.
पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकाने दोन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या वानवडी परिसरात ३० सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी व्हॅन चालक पीडित मुलींना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून त्याच्यांसोबत अश्लील चाळे करत होता. एका पीडित मुलीने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी संजय जेटींग रेड्डी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे विचारणा केली असता तिने संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, असे पीडिततेने वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. दुसऱ्या मुलीनेही पालकांना संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी व्हॅन चालक संजय रेड्डीला अटक केली.













