न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- कंपनीच्या नावे बनावट बिले तयार करून एक कोटी तीन लाख ७१ हजार ५६८ रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) न भरता तरुणाची आणि शासनाची फसवणूक केली. मोशी येथे ३ ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
दीपक गोरक्षनाथ भगत (३६, रा. मोशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ४) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोहम्मद कैश रेहमानी (३०, रा. कुदळवाडी, चिखली) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कर्ज काढून देतो, असे म्हणून संशयित रेहमानी याने फिर्यादी दीपक यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, वीजबिल घेतले. त्यानंतर परस्पर या कागदपत्रांच्या आधारे दीपक यांच्या नावाने डी. बी. एंटरप्रायजेस कंपनीचे शॉप अॅक्ट लायसन्स, उद्यम आधार काढून संबंधित कंपनीची जीएसटी नोंदणी केली. त्यानंतर डी. बी. एंटरप्रायझेस कंपनीच्या नावाची बनावट बिले तयार करून कश्यप ट्रेडिंग कंपनी व इतर कंपनीस बिले दिल्याचे जीएसटी कार्यालयाच्या पोर्टलवर नोंद केली. डी. बी. एंटरप्रायझेस कंपनीवर पाच कोटी ७६ लाख १९ हजार ८२६ रुपयांचा व्यवसाय दाखवून त्यावरील एक कोटी तीन लाख ७१ हजार ५६८ रुपये जीएसटी न भरता फिर्यादी दीपक व शासनाची फसवणूक केली.












