- पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील विविध संवर्गातील १८ कर्मचाऱ्यांनी महापालिका सेवेचा राजीनामा दिला आहे. सरळ सेवा भरतीमध्ये राज्य सरकारतच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी महापालिका सेवेला रामराम ठोकला आहे.
पिंपरी विचवड महापालिकेच्या वतीने सरळसेवा भरतीअंतर्गत गट क मधील विविध संवर्गातील पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घ्यावी लागली. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलावून, सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांना महापालिका, आस्थापनेवरील रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
महापालिकेच्या लिपिक पदावर निवड झालेल्या उमेदवारांपैकी काही जणांना महापालिका सेवेत रस नसल्याने हे उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता वेळत उपस्थित राहिले नाहीत. एका उमेदवाराने शारिरीक पडताळणी अहवाल पालिकेला सादर केला नाही. तर सहा उमेदवारांनी लिपिक पदावर रुजू होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे या ११ लिपिकांची निवड आधीच रद्द करण्यात आली आहे.
नुकतेच सेवेत रुजू झालेले कर्मचारी अचानकपणे पालिकेच्या सेवेचा राजीनाम देत असल्याने ही बाब पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. तर आता महापालिका प्रशासनाच्या नतीने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा शोध घेत, त्यांना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.












