- एक लाख वाहनधारकांना आरटीओकडून थकीत दंडाबद्दल मेसेज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- तुमच्या वाहनाचा दंड थकीत आहे का? किंवा योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करायचे राहिले आहे का? मग, फार दुर्लक्ष करु नका कारण, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनधारकांना आता मोबाईल संदेशाद्वारे थकीत दंडापासून ते योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणापर्यंतचे मागणीपत्र पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे एक लाख वाहनधारकांना थकीत दंडाबद्दल संदेश पाठवण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चा कारभार ‘हायटेक’ झाला असून अनेक ऑनलाइन सुविधांमुळे नागरिकांची कामे देखील वेगाने होत आहेत, त्यामध्ये, वाहन धारकांना आता आपल्या वाहनांची माहिती ‘आरटीओ’कडून प्राप्त होणार आहे. थकीत दंडापासून ते योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा संदेश देखील मोबाईलद्वारे नागरिकांना प्राप्त होणार आहे. त्या संदेशामध्येच लिंकद्वारे संबंधित वाहनधारकाला पुढील प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना मागणी पत्र प्राप्त होईल. परिणामी, आरटीओ कार्यालयातील हेलपाटे आणि वाहनधारकाचा वेळही वाचणार आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही सुविधा वाहनधारकांना सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे, दैनंदिन कामकाजाला गती मिळावी, यासाठी ‘आरटीओ’ने ऑनलाइन कामावर अधिक भर दिला आहे. कार्यालयाचा दर्जा वाढवून ते प्रादेशिक परिवहन कार्यालय करण्यात आल्याने गर्दीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, कार्यालयांतर्गत विविध बदल केले जात आहेत. वाहनधारकांना चोइस नंबरसाठी थेट ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याला वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याचाच पुढील एक भाग म्हणून आता वाहनधारकांना त्यांच्या स्वतःच्या वाहनाची माहिती संदेशाद्वारे मोबाईल मार्फत प्राप्त होणार आहे.
वाहनधारकांना वाहनावरील चलनाचा दंड भरणे, थकीत कर भरणे, परवाना नूतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र व नूतनीकरण अशा विविध कामकाजाची माहिती देण्यासाठी लघु संदेश सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये थकीत कर आणि दंड वसूल करण्याबाबत वाहनधारकांना मोबाईलच्या माध्यमातून नोटिसा प्राप्त होणार आहे. यापूर्वी वाहन धारकांना टपालाद्वारे नोटीस पाठवण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये मोठा विलंब होत होता. तसेच, ती प्राप्त न झाल्याने अनेक वाहनधारकांना त्याची माहिती होत नाही. त्यामुळे, आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
लघु संदेश सेवा अंतर्गत वाहनधारकास सीपी-आरटीओपीसीएम (CP-RTOPCM) या नावाने लघु संदेश (एसएमएस) पाठवला जाणार आहे. या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर, कार्यालयाचे इंग्रजी व मराठी स्वरुपातील मागणीपत्र नागरिकांना पाहता येणार आहे.
नवीन प्रणालीनुसार नागरिकांना पहिल्या टप्प्यामध्ये थकीत दंड आणि वसुलीबाबत वाहनधारकांना संदेश पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र, परवाना नूतनीकरण, वेगवेगळे कर या संदर्भात देखील वाहनधारकांना माहिती प्राप्त होईल. त्याबाबत सेवा सुरू करण्यात आली आहे.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड…