- भाजपकडून भान राखण्याचा सल्ला तर, राष्ट्रवादीकडून कोपरखळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी आणि चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी झाली. त्यात बंडाचा पवित्रा घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह इतरांनी चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा आग्रह धरला. त्यावर महायुतीच्या जागा वाटपात शहरातील जागांचा अंतिम निर्णय झालेला नाही, लवकरच होईल, असे सांगत पवार यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, दुसरीकडे भाजपने आता थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष केले असून थेट इशारावजा सूचना देत भान राखण्याचा सल्ला दिला आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा आ. अमित गोरखे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओद्वारे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर निशाना साधला आहे. ते म्हणाले. ‘चिंचवड विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे’. तरीही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी तो आम्हाला द्यावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नुकतेच अजित पवार यांना भेटून आले. मुळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये खडा टाकण्याचे काम करू नये. महायुतीचे शीर्षस्थ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्याबाबत निर्णय घेतील. त्यांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनाच कल्पना आहे. पुन्हा-पुन्हा तीच मागणी करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर, महायुतीमध्ये खडा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. याच्यामागे नेमके कोण आहे? याची माहिती घ्यायला हवी. महायुतीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी याच भान राखून राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. मागील पंधरवड्यात पिंपरीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तिन्ही जागांवर दावा करण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही पक्षविरहित मेळावा घेतला. त्यामुळे आता पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच अजित पवारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अजित पवार ही परिस्थिती कशी हाताळतात यावर सर्व अवलंबून आहे. अन्यथा भाजपच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागू शकते.
राष्ट्रवादीवर टीका करण्याएवढे भाजपा प्रवक्ते मोठे नाहीत. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही तर, आमचे नेते अजित पवार यांच्याकडे मतदारसंघाबाबत मागणी करीत आहोत. गेल्या १५ ते २० वर्षांपासून शहरात राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजप पाच वर्ष झालं सत्तेत आलं, म्हणजे मिठाचा खडा टाकला असं होत? भाजपकडील नगरसेवक हे राष्ट्रवादीमधूनच तिकडे गेले आहेत. त्यामुळे ते आज आमच्याच बाजूने उभे राहणार. आमचे नातेवाईक मोठ्या संख्येने चिंचवड मतदार संघात आहेत. ऐनवेळी उ.बा.ठा. गटाचा पाठींबा घेऊ पणं आम्ही निवडणूक लढवू. – मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक – राष्ट्रवादी (अजित पवार गट)…












