- अजित पवारांकडुन विधानसभेची उमेदवारी फायनल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि 10 ऑक्टोबर 2024) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पिंपरी विधानसभा क्षेत्राच्या राजकिय पटलावर मोठी घडामोड करणारा ठरला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादा पवार शहरात सकाळी दाखल झाले होते. मात्र या सगळ्या मध्ये पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी निवडणुकी पूर्वी अचूक टायमिंग साधत विरोधकांचे फेक नरेटिव्हचे, भुछत्राप्रमाणे उगवलेले इच्छुक उमेदवार व स्वतःच्या पक्षात तिकिट विक्रीसाठी सरसावलेले नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांचा एकत्रित समाचार घेतल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
मागील काही दिवसापासून पिंपरी विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरले आहेत. ते सातत्याने विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात नकारात्मक प्रचार करण्यासाठी कुरघोडी करत होते. काही पत्रकारांना घेऊन त्यांच्या विरोधात फेक नरेटिव्ह सेट करत होते तर, स्वपक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवक नाराज असल्याचं भासवून पक्षाने तिकीट दुसऱ्या उमेदवाराला द्यावे यासाठी सुपारी घेऊन अजितदादा यांच्या गाठी भेटी घेत होते. यावर मागील 2-3 महिन्यापासून कधीही कोणतेही प्रतिक्रिया न देता आज मात्र आमदार अण्णा बनसोडे यांनी उदघाटन कार्यक्रमात आपणच पिंपरी विधानसभेचे कर्ते करवितो आहोत हे सिद्ध केले आहे.
आजच्या उदघाटन कार्यक्रमाने आमदार अण्णा बनसोडे यांनी काय साध्य केले?..
◆ बोपखेल येथील पुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते, कधी पर्यावरण तर कधी संरक्षण विभागाच्या परवानगीच्या फेऱ्यामध्ये अडकले होते. आमदार अण्णा बनसोडे यांनी याचा यशस्वी पाठपुरावा करत पूल लोकांसाठी खुला करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्याच पुलाचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे बोपखेल गावातील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये व नागरिकांमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची प्रतिमा अधिक उजळ झाली आहे.
जवळपास पिंपरी विधानसभा क्षेत्रातील ५०० कोटी पेक्षा अधिक विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये प्राधिकरण मधील हरीत सेतू प्रकल्प,पिंपरी गाव व पिंपळे सौदागर यांना जोडणारा समांतर पूल,पिंपरी व आकुर्डी येथील घरकुल योजना,निगडी ते दापोडी जलवाहिनी टाकण्याचे काम असे लोकपयोगी कामाचा धडाका आमदार अण्णा बनसोडे यांनी वावला. त्यामुळे निगडी,दापोडी,पिंपरी,बोपखेल या पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सर्व महत्वाच्या भागात विकासकामे केली आहेत हे अधोरेखित केले.
◆माता रमाई स्मारकाचा प्रश्न आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावर अनेक आंदोलन झाली. त्याचा देखील सातत्याने पाठपुरावा आमदार अण्णा बनसोडे घेत होते. अजित दादा पवार भाषणाला उठल्यानंतर माता रमाई स्मारकाचा उल्लेख विसरले होते. तेव्हा स्टेजवरून उठून आमदार अण्णा बनसोडे यांनी दादांना माता रमाई स्मारकाबद्दल भूमिका स्पष्ट करावी व तशी सूचना पालिका आयुक्त व PMPML चे मुख्य कार्यकारी संचालक यांना द्यावी, अशी चिठ्ठी दिली. त्यानंतर अजित दादांनी नियोजित जागेत माता रमाई स्मारक तातडीने झाले पाहिजे व त्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने आदेश देत आहे असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना सांगितले. त्यामुळे आंबेडकरी जनतेत देखील आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यशैली बद्दल सकारात्मक चर्चा ऐकायला येत आहे.
◆पक्षांतर्गत नाराजी असल्याचे चित्र भासवून काही नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी अण्णा बनसोडे यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करत होते. मात्र दिवसभरातील अजित पवार यांच्या गाडीतील अण्णा बनसोडे यांचा वावर,अजित दादा सोबतच ट्युनिंग यामुळे अजितदादा आमदार अण्णा बनसोडे यांनाच पुन्हा संधी देणार आहेत याचे स्पष्ट संकेत अजित दादा पवार यांनी दिले आहेत.