- कर भरणा करण्याचा थेट मालमत्ताधारकांस येणार एसएमएस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन माहितीच्या आधारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता विक्री करणार, मालमत्ता खरेदी करणार, मालमत्ता नोंदणी दिनांक व मालमत्तेचा व्यवहाराचा तपशिल प्राप्त होणार आहे. उपरोक्त तपशील अचूक भरल्याची खात्री झालेनंतर मालमत्तेचे बाजारमूल्य अथवा मुद्रांक शुल्क ज्या रकमेवर भरणा केले आहे यापैकी जी रक्कम सर्वौच्च असेल त्या रकमेवर ०.५० टक्के इतके मालमत्ता हस्तांतरण शुल्काची आकारणी करुन मालमत्ताधारकांस हस्तांतरण शुल्काची एकूण रक्कम ऑनलाइन स्वरुपात भरणा करण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे.
मालमत्ताधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे मालमत्ता हस्तांतरण शुल्काची रक्कम तात्काळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरणा करावी. याबरोबरच, मालमत्ताधारकांनी हस्तांतरण शुल्काच्या रकमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास मालमत्ता कराच्या पुढील बिलामध्ये हस्तांतरण शुल्काचा समावेश करण्यात येणार आहे. याचबरोबर, यापुढे ज्यांना मालमत्ता खरेदी अथवा मालमत्ता विक्री करावयाची आहे अशा नागरिकांनी मालमत्तेच्या दस्ताची नोंद करतेवेळी आपला मालमत्ता क्रमांक नमूद करावा. असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण करण्यात आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटीबध्द असून सदर प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचवून त्यांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…











