- कोटीच्या खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या इसमाची सुखरूप सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२४) :- एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एका इसमाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबुन ठेवले. या अपहृत इसमाची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपीना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने अटक केली आहे.
याप्रकरणी १) नसीम मनीरुल हक अख्तर वय-२० वर्षे रा. धरमपूर, तीनमुहानी, ठाणे-मुथाबाडी जिल्हा-मालदा राज्य पश्चिम बंगाल, २) लल्लू रुस्तम शेख वय-४५ वर्षे रा. अमानत दियारा, ठाणे-राधानगर, जिल्हा-साहेबगंज राज्य झारखंड यांना ५०,०००/-रु किंच्या ०३ मोबाईलसह ताब्यात घेवून, अटक केली. ०३ आरोपी गंगा नदीत उडी मारुन पळून जाण्यास यशस्वी झाले. तसेच आरोपीतांच्या एका साथीदाराला साजीम करिम बबलू शेख, वय २० वर्षे, छक्कुटोळा, ता. मोथाळवाडी, जि. मालदा राज्य-पश्चिम बंगाल यास २०,०००/- किंच्या ०२ मोबाईल फोनसह कल्याण ठाणे येथून ताब्यात घेतले. तसेच इतर तीन आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले आहे.
तक्रारदारांच्या वडीलांचे अपहरण करून आरोपी यांनी मोबाईल फोनवरुन ०१ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. तसेच पैसे न दिल्यास तसेच पोलीसांकडे गेल्यास तक्रारदारांच्या वडीलांना जीवे ठार मारु, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान अपहरण झालेल्या इसमास नारळ पाणी विक्रेता याने विमानाने कोलकत्ता, (पश्चिम बंगाल) येथे नेल्याचे निष्पन्न झाल्याने, पुणे विमानतळावरील कोलकत्त्याला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांची माहिती घेवून, सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयीत इसमांची माहिती प्राप्त करुन, प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन, इतर संशयीत इसमांचे मोबाईल नंबर प्राप्त केले. अपहृत इसमाचा व आरोपींचा शोध घेणेकरीता झारखंड व पश्चिम बंगाल राज्यात पथक रवाना करण्यात आले.
दरम्यान अपहृत व्यक्तीच्या मुलास आरोपी हे त्यांच्या वडीलांच्या फोनवरुन, ०१ कोटी लवकर जमा कर, पोलीसाकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडीलांना ठार मारुन टाकू. अशी धमकी देवून, रात्री १० पर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो असे सांगून, फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सांयकाळी ०७/३० वाजता आरोपीतांनी फोन करुन, पैसे किती जमा झाले. अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेवून ये. असे कळवून फोन बंद केला. अपहृत इसमाचे मुलास खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस अधिक्षक, मालदा, (पश्चिम बंगाल) व साहीबगंज, (झारखंड) यांचेशी संपर्क करुन, दाखल गुन्हयाबाबत माहिती देवून, तपासात मदत करण्याबाबत कळविले.
त्यानंतर गुन्हेशाखेकडील पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, राजमहल, (झारखंड) यांचे पथकाने रात्रीच्या अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोऱ्यात गंगा नदीतुन बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करुन पथकाने आरोपींचा माग काढत, गंगा नदीपाञात गोलढाब बेटावर छापा कारवाई करुन, पहाटे ०५.०० वाचे सुमारास अपहृत इसमाची सुखरुप सुटका केली. गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाणे करीत आहे.