- वडगाव मावळ न्यायालयाकडून निर्दयी पित्याला जन्मठेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व लहान मुलाचा कोयत्याने खून करून मुलीस व साक्षीदाराला गंभीररित्या जखमी करणाऱ्या पतीला वडगाव मावळ न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वसंत गोपाळ सातकर (वय ४७, रा. कान्हे, ता. मावळ) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी रजनी, मुलगा अनुष या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता; तर मुलगी शुभा जखमी झाली होती. ही घटना १० जुलै २०१७ रोजी कान्हे येथे घडली होती.
राहत्या घरात सर्व सातकर कुटुंब झोपले होते. रात्रीच्या सुमारास आरोपी वसंत सातकर याने कपाटाच्या खालून ऊस तोडणीचा कोयता काढला. तेव्हा, मुलीला जाग आली. सातकर याने पत्नीच्या मानेवर व हातावर तसेच मुलगा या दोघांवर वार केले. नंतर मुलीवर वार केले, या हल्ल्यात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला; तर मुलगी शुभा सातकर व गणेश आंबेकर हे दोघे जखमी झाले होते. ह्या हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला. नंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.
सरकार पक्षातर्फे अॅड. सुनील मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. अॅड. मोरे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बसंत सातकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास तेव्हाचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी केला होता.