- उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उरले केवळ सहा दिवस..
- अद्याप एकाही इच्छुक उमेदवाराचं नाव अंतिम नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- महायुतीने शहरातील तीनही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचारही सुरू केला आहे. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असल्याने अधिकृत रित्या प्रचार सुरू होईल. परंतु, दुसरीकडे मुख्य विरोधी असलेल्या मविआत मात्र संभ्रमावस्था दिसून येत आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार हेच अद्याप स्पष्ट नाही.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु पक्षश्रेष्ठी इतर पक्षांतील नाराजांसोबत भेटी गाठी करत आहेत. सध्या तीनही मतदारसंघात इतर पक्षातून आलेले किंवा येण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचीच नावे चर्चेत आहेत. पक्षाशी निष्ठावान असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत बरीच मागे पडली आहे. यामुळे मविआची संपूर्ण मदार आयात उमेदवारांवरच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर शहरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंगही सुरू झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविले. त्यांना पुण्यात बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या. काहींना वरिष्ठांना तयारीला लागण्याचे संदेशही दिले. परंतु आता या पदाधिकाऱ्यांची नावे क्वचितच चर्चेत येत आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नाराजांची नावे मविआच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजांनी उमेदवारीसाठी प्रवेश केला आहे. परंतु अद्याप त्यांनाही उमेदवारीबाबत आश्वस्त केलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस सध्या शहरात कुठेच चर्चेतही दिसून येत नाही. कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बहुधा तीनपैकी एकही मतदारसंघ आपल्याला मिळणार नाही, असे मानून शांत राहणेच पसंत केले आहे.

















