न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सोमवारी (दि. २८) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते पिंपरी विधानसभा मतदारसंघांमधून कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रिंगणात उतरले आहेत. पिंपरी ते निगडी भव्य रॅली आयोजित करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला. या वेळी शहरातील रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, सफाई कामगारांसह असंघटित कामगारांची मोठी उपस्थिती होती.
अर्ज दाखल करताना फेरीवाला समिती सदस्य ममता मानुरकर, बळीराम काकडे, रिक्षा ब्रिगेड प्रमुख बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष गुंड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, प्रवक्ते अविनाश जोगदंड, कार्याध्यक्ष रवींद्र लंके, हिरामण गवारे उपाध्यक्ष जाफर शेख आदी उपस्थित होते.
गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही वेळोवेळी राजकीय भूमिका घेतली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना विधानसभा व लोकसभेमध्ये जाहीर पाठिंबा दिला. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु आमचे प्रश्न मात्र दुर्लक्षीत राहिले. आमच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. यामुळे आता कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाहिजेत, अशी भूमिका कष्टकरी जनतेची आहे. त्यांच्या आग्रहाखातर हा उमेदवारी अर्ज मी दाखल केला आहे. मी प्रचंड बहुमताने निवडून येईल, असा मला विश्वास आहे.
– बाबा कांबळे, अपक्ष उमेदवार, पिंपरी विधानसभा. तथा राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकरी जनता आघाडी…