- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ अॅपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते सोमवारपर्यंत पिंपरी-चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघातून एकूण ११९ तक्रारी प्राप्त झाल्या व तथ्य आढळलेल्या ११२ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ अॅपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित आहे.
सी-व्हिजिल अॅपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या अॅपमध्ये आहे. अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपासून ते सोमवारपर्यंत (दि. ११) चारही मतदारसंघांतून ११९ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ११२ तक्रारींवर कारवाई, तर उर्वरित तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या सी- व्हिजिल अॅपच्या माध्यमातून नागरिकांना करता येते. या अॅपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते.

















