न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनची निवडणूक शनिवारी (दि. ३०) होणार आहे. त्यापूर्वीच अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड. गौरव वाळुंज तरपदी अॅड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले होते. यामधील अध्यक्षपदाचे उमेदवार मुकुंद ओव्हाळ व सचिव पदाचे उमेदवार गणेश राऊत यांनी अर्ज मागे घेतल्याने अध्यक्ष व सचिव या दोन मुख्य पदांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
याचबरोबर कार्यकारिणीतील महिला सचिवपदी रीना मगदूम, सहसचिवपदी राकेश जैद, खजिनदारपदी अक्षय फुगे, हिशेब तपासणीसपदी शंकर घंगाळे, तर सदस्यपदी विकास शर्मा, संघर्ष सूर्यवंशी, मानसी उदासी, संकेत सरोदे, राजेश राजपुरोहित, सीमा शर्मा यांचीबिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणीतील उपाध्यक्ष या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी अनिल पवार, अतुल कांबळे आणि पल्लवी विघ्ने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष रामराजे भोसले पाटील आणि कार्यकारिणीद्वारे सुशील मंचरकर यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून, संगीता परब, शंकर पल्ले, वैभव कल्याणकर यांची निवडणूक अधिकारी सहायक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
निवडणूक ही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या नियमानुसार व त्यांनी नेमलेले निरीक्षक श्रीकांत अगस्ते यांच्या देखरेखीखाली शनिवारी नेहरूनगर, पिपरी न्यायालयात सकाळी १० ते सायंकाळी ५:३० यादरम्यान होणार आहे. या निवडणुकीत आता उपाध्यक्ष पदासाठी चांगलीच चूरस निर्माण झाली आहे. उपाध्यक्ष पदासाठी तीन जण रिंगणात आहेत.












