न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- आम आदमी पार्टीने दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यांनी रविवारी (१ डिसेंबर) दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला.
केजरीवाल म्हणाले, “आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. आमच्या पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे”. अरविंद केजरीवाल यांनी आतापर्यंत आघाडीबाबत ठाम भूमिका मांडली नव्हती.
मात्र, हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपने कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी न करण्याचा सूर आळवला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं. केजरीवालांच्या या निर्णयामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आप, भाजपा व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.












