न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लाड पागे योजनेंतर्गत महापालिकेतील सात जणांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. आता आचारसंहिता शिथिल झाल्याने त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाड – पागे समितीनुसार वारसा हक्क १९७५ पासून लागू आहे. पण, त्याविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने या निर्णयाला स्थगिती आदेश होता. त्यातच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. दरम्यान, काही प्रवर्गातील अर्जदारांना नियुक्ती देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार महापालिकेने ५५ पैकी ४७ जणांना आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या दिल्या आहेत. सात जणांचे अर्ज वैद्यकीय विभागाकडे पाठवले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी होऊन, पुढील नियुक्त्या देण्यात येणार आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान क्षेत्रीय कार्यालयनिहाय अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्याची विभागणी करून त्या नियुक्त्यांनाही येणाऱ्या १५ दिवसांत गती मिळणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून निवडणूक आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी रूजू झाले आहेत. लाड-पागे समितीच्या नियोजनानुसार संबंधित अर्जावर काम सुरू करण्यात येईल. पुढील १५ दिवसांत राहिलेल्या नियुक्त्यांना गती देण्यात येणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका…












