- दुसरीकडे सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा महापालिकेचा दावा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२४) :- शहरात शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून शहरातील प्रमुख रस्ते विकसित करण्यात येत आहे. या कामासाठी रस्त्याची खोदाई सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागून कॉडी होत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचारीही हैराण झाले आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी नऊ फुटाचा पदपथ होता. मात्र आता अर्बन स्ट्रीटच्या डिझाईननुसार सुशोभीकरणाचे काम झाल्यावर पदपथ ९ फूट १० इंचाचा, सायकल ट्रॅक ५ फूट आणि वाहनांसाठी पार्किंग स्पॉट ९ फूट ६ इंचाचा केला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा रस्ता १५ फुटाने कमी झाला आहे. परिणामी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोरवाडी चौकाजवळ अर्बन स्ट्रीटमुळे रस्ता अरुंद झाला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य व उपनगर रस्त्यांचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार सुशोभीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते, पादचारी मार्ग, सायकल स्वारांसाठी सायकल मार्ग, टू व्हीलर आणि फोर व्हीलरला पार्किंग स्पॉट, आकर्षक पथदिवे, या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.
रस्ते अरूंद का करता?
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असताना महापालिका मात्र आहेत ते रस्ते आणखी अरुंद करताना दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











